पंजाबमधील आम आदमी पार्टी (AAP) सरकारचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema) यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. पंजाबमध्येभाजपाने ऑपरेशन लोटस चालवले असून भाजपा आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरपाल सिंग चीमा म्हणाले. अर्थमंत्री चीमा यांनी भाजपा प्रत्येक AAP आमदाराला प्रत्येकी 25-25 कोटी रुपयांची ऑफर देत आहे असं म्हटलं आहे.
आप पंजाबने याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं. "सीरियल किलर भाजपाने आता पंजाबमध्ये ऑपरेशन लोटस आणले आहे. पंजाबमधील 'आप'च्या आमदारांना 25-25 कोटींची ऑफर दिली आहे. पण भाजपा हे विसरत आहे की आम आदमी पक्षाचा एकही आमदार विक्रीसाठी नाही. दिल्लीप्रमाणे पंजाबमध्येही भाजपाची कारवाई अपयशी ठरेल" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'आप'पासून वेगळे होण्यासाठी 25 कोटी रुपयांची ऑफर
पंजाबचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी मंगळवारी चंदीगड येथे पत्रकार परिषदेत भाजपावर आरोप केला की, 'आप'चे आमदार विकत घेऊन पंजाबमधील 'आप' सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमधील ऑपरेशन लोटससाठी भाजपा केंद्रीय एजन्सी तसेच पैसा वापरत आहे. अर्थमंत्री चीमा म्हणाले की, भाजपाने आमच्या आमदारांना 'आप'पासून वेगळे होण्यासाठी 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. एवढेच नाही तर भाजपाने या आमदारांना मोठ्या पदाचे आमिषही दिले आहे. यासोबतच तुम्हाला आणखी आमदार मिळाल्यास 75 कोटी रुपये दिले जातील, असे सांगितले.
'आप'च्या 10 आमदारांशी साधला संपर्क भाजपावर आरोप करताना हरपाल सिंग चीमा म्हणाले की, भाजपा नेते आप आमदारांना सांगत आहेत की सरकार पाडण्यासाठी त्यांना फक्त 35 आमदारांची गरज आहे. काँग्रेसचे आमदार त्यांच्या संपर्कात असल्याने ते असे बोलत आहेत. चीमा म्हणाले की भाजपाने पंजाबमधील सात ते 10 आप आमदारांशी संपर्क साधला आहे, परंतु चीमा यांनी या आमदारांची नावे घेतली नाहीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.