'घर रिकामं' करायला दिल्लीत आलेला बडा नेता अमित शहांच्या भेटीला; काँग्रेसला मोठा धक्का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 06:31 PM2021-09-29T18:31:32+5:302021-09-29T20:22:20+5:30
काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
नवी दिल्ली: पंजाबकाँग्रेसमध्ये घमासान सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. सिंग कालच दिल्लीत दाखल झाले. त्यांची आणि शाह यांची भेट कालच होणार होती. मात्र नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय खळबळ माजली. त्यामुळे शाह आणि सिंग यांची भेट पुढे ढकलण्यात आली. आपण कोणाच्याही भेटीला जाणार नसल्याचं सिंग यांनी म्हटलं होतं. मात्र आता सिंग शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
#WATCH | Former Punjab CM and Congress leader Captain Amarinder Singh reaches the residence of Union Home Minister Amit Shah in New Delhi pic.twitter.com/787frIaou7
— ANI (@ANI) September 29, 2021
अमरिंदर सिंग लवकरच काँग्रेसला रामराम करून हाती कमळ घेऊ शकतात. त्यांना राज्यसभेवर पाठवून महत्त्वाची मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषिमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हरयाणा, पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. सिंग यांनी कृषिमंत्री करून मोदी सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देऊ शकतं.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा योग्य वापर कुठे आणि कसा करता येईल, याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे. सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास पंजाबमध्ये ते पक्षाचा चेहरा असतील किंवा सिंह यांनी एखादा राजकीय पक्ष स्थापन केल्यास त्याला बाहेरुन पाठिंबा देण्याची खेळी भाजपकडून केली जाऊ शकते. या शक्यतेवर गांभीर्यानं विचार सुरू आहे.