नवी दिल्ली - राज्यांमध्ये सरकार बदलतं तेव्हा काहींना काही मनोरंजक गोष्टी समोर येत असतात. त्याचबरोबर मंत्र्यांचे सरकारी बंगल्यावरील प्रेमही चर्चेत असतं. पंजाबमध्येही असाच प्रकार पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांना सरकारी बंगले रिकामे करण्यास सांगण्यात आले. पंजाबच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसच्या मंत्र्यांनी बंगले रिकामे केले आहेत पण त्यातील लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू आता गायब झाल्या आहेत.
पंजाबच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं विधानसभेच्या सचिवांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. ज्यामध्ये सरकारी खोल्यांमधून फर्निचरशिवाय इलेक्ट्रिक वस्तू नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या वस्तूंमध्ये एलईडी, जेवणाचे टेबल, फ्रीज, खुर्च्या, सोफा, पंखे यांचा समावेश आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व माजी मंत्र्यांना बंगाले रिकामी करण्याचे आदेश मिळाले आणि यादरम्यान माजी अर्थमंत्री मनप्रीत बादल आणि माजी कॅबिनेट मंत्री गुरप्रीत सिंग कांगार यांनी बंगले रिकामे केले आहेत.
पीडब्ल्यूडीने केलेल्या तक्रारीनंतर बंगला रिकामा करण्यासोबतच माजी मंत्र्यांनी या वस्तूही सोबत घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सामानाचे काय झाले याबाबत काहीही स्पष्ट करता येत नसले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या पत्रात मंत्र्यांना माल विभागाकडे सुपूर्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने 24 मार्च रोजी जारी केलेल्या पत्र क्रमांक 135 मध्ये माजी मंत्री मनप्रीत सिंग बादल यांनी सेक्टर 2 मधील 47 क्रमांकाची बंगला रिकामी केल्याचं लिहिलं आहे.
विभागाचे कनिष्ठ अभियंता लवप्रीत सिंग यांनी त्यांच्या अहवालात लिहिले आहे की, बंगल्यातील एक जेवणाचे टेबल, 10 जेवणाच्या खुर्च्या, एक सर्व्हिस ट्रॉली आणि एक रिंक लाउंजर सोफा कमी असल्याचं आढळून आलं आहे. 10 मार्च रोजी पत्र क्रमांक 5263 मध्ये माजी मंत्री गुरप्रीत सिंग यांच्या सेक्टर 17 मध्ये असलेल्या बंगला क्रमांक 960 मध्ये मौल्यवान वस्तू कमी सापडल्याचा रिपोर्ट आहे. या बंगल्यातून 420 लीटरचा नवीन रेफ्रिजरेटर (किंमत 65,530) आणि 422 लीटरचा फ्रीज (किंमत 44000 रुपये), 43 इंच पाच एलईडी (किंमत 2,98100), ओएफआरआरचे चार हिटर (किंमत 56680), सहा हिटर (किंमत रु. 13110) ), सिंगल रॉड रूम हीटर (किंमत रु. 835), पाच पंखे (किंमत रु. 8000) गायब आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.