नवी दिल्ली – एनसीआरमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती पाहता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यात नवीन निर्बंध लागू केले आहेत, सर्व शहरांत व बाजारपेठांमध्ये पुन्हा रात्रीचा कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत १ डिसेंबरपासून मास्क न घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन न करणाऱ्यांकडून दुप्पट दंड आकाराणी करण्यात येणार आहे.
पंजाबमधील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न सोहळे रात्री ९.३० वाजता बंद होतील, रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहील. पंजाब सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन न केल्यास आता ५०० रुपयांऐवजी १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. १५ डिसेंबर रोजी रात्रीच्या कर्फ्यूचा आढावा घेतला जाईल.
दिल्ली रुग्णांची संख्या लक्षात घेता पंजाब राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यास व अनुकूलित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या मदतीने लाभ मिळावा यासाठी मुख्य सचिव विनी महाजन यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची उपलब्धता आणखी मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एल II आणि एल III बळकट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये एल III सुविधा उपलब्ध नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये सतत देखरेखीचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, तज्ज्ञ, परिचारिका व पॅरामेडिकल कर्मचार्यांची आपत्कालीन नियुक्ती करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागांना दिले आहेत. २४९ तज्ञ डॉक्टर आणि ४०७ वैद्यकीय अधिकारी भरती होणार आहेत. भविष्यात आवश्यक असल्यास एमबीबीएसच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.
दिल्लीतील शाळा बंद
कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देशभरात मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. तर काही ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न देखील केले गेले. मात्र कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढत असल्याची परिस्थितीपाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे देखील घेण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतेक पालक शाळा सुरू करण्याच्या विरोधात असल्याचं सिसोदिया यांनी ३० ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दिल्लीतील शाळा बंदच राहतील अशी घोषणा सिसोदिया यांनी केली होती. आता सिसोदिया यांनी थेट जोवर लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे.