(Punjab CM Bhagwant Mann) : काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं. दरम्यान, आता मान सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. पंजाबवर तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज कसं झालं यासंदर्भात आता भगवंत मान सरकार चौकशी करणार आहे. यापूर्वीच्या सरकारांनी कशाप्रकारे खर्च केला आहे याची तपासणी करण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यमान सरकारवर तीन लाख कोटी रूपयांचं कर्ज झालं आहे, असं भगवंत मान म्हणाले. “हा पैसा सामान्य जनतेचा आहे आणि तो कुठे खर्च करण्यात आला आहे हे तपासलं जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यावरील ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जासंबंधी मोठी घोषणा केली आहे. “आप सरकार याची चौकशी करणार आहे. हा पैसा कुठे गेला? यापूर्वीच्या सरकारांनी हे कर्ज मागे सोडलं आहे. या रकमेचा कुठे वापर केला? याची तपासणी करून ते रिकव्हर केलं जाईल. तो लोकांचा पैसा आहे,” असं भगवंत मान म्हणाले.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या घोषणेनं पंजाबवर दशकांपासून राज्य करत असलेल्या काँग्रेस आणि अकाली दलाच्या समस्या वाढवल्या आहेत. पंजाबमध्ये गेल्या सात दशकांपासून काँग्रेस आणि अकाली दल यांच्या नेतृत्वाखालील सरकारं होती.