चंडीगड : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी केला. मात्र, मणिपूर आणि हरयाणामधील राज्यपाल तेथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मौन पाळत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पुरोहित यांनी शुक्रवारी मान सरकारला इशारा दिला होता की, ते राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात आणि त्यांच्या पत्रांना उत्तर न दिल्यास फौजदारी कारवाईदेखील सुरू करू शकतात. मान हे त्यांना पाठविलेल्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या अधिकाराचा अवमान होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे. मान म्हणाले की, पंजाबच्या राज्यपालांनी त्यांना १६ पत्रे लिहिली होती. त्यांपैकी नऊ पत्रांना उत्तर देण्यात आले आहे. राज्यपालांनी पत्र लिहिण्याची घाई करू नये आणि त्वरित उत्तराची अपेक्षा करू नये, असे ते म्हणाले.
मान म्हणाले की, त्यांचे सरकार अमली पदार्थांच्या विळख्याला तोंड देण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे. तस्करांच्या मालमत्ता जप्त करणे, छापे टाकणे अशा कारवाया केल्या जात आहेत. पण, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे.
मला राज्यपालांना विचारायचे आहे की, हरयाणाच्या राज्यपालांनी हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना नूह येथे घडलेल्या घटना, जातीय संघर्ष आणि हिंसाचार यांबाबत नोटीस बजावली आहे का? हरयाणाच्या राज्यपालांनी त्यांना काही पत्र लिहिले आहे का? पंजाबचे राज्यपाल पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंतित होते; परंतु, मणिपूरवर त्यांनी कधीही विधान केले नाही.