शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंजाबमधील आम आदमी पार्टी (AAP) सरकारने मोठी घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेला शेतकरी शुभकरण याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय शेतकऱ्याच्या लहान बहिणीलाही सरकारी नोकरी देखील दिली जाणार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पंजाब सरकार मृत्यू झालेला शेतकरी शुभकरणच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत करणार आहे. तसेच शुभकरणच्या धाकट्या बहिणीला पंजाब सरकार नोकरी देणार आहे. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. कर्तव्य पार पाडत आहोत" असं मान यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी पंजाब-हरियाणा बॉर्डरवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. याच दरम्यान, हरियाणा बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दावा केला आहे की, खनौरी बॉर्डरवर बुधवारी एका 21 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्यानंतर शेतकरी संतापले आहेत. शुभकरण सिंह असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
या घटनेबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आधीच सांगितलं आहे की, शुभकरणच्या पोस्टमार्टमनंतर एफआयआर नोंदवला जाईल. शुभकरणच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हरियाणा पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
2 वर्षांपूर्वी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू असताना शुभकरण सिंह शेतकरी संघटनेत सहभागी झाला होता. भारतीय किसान एकता सिद्धपूर युनियनचा शुभकरण सिंह शेतकऱ्यांसोबत दिल्लीच्या दिशेने कूच करत असताना 13 फेब्रुवारीला खनौरी सीमेवर पोहोचला. शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार, शुभकरण सिंहने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बुधवारी आंदोलनस्थळी स्वत: नाश्ता तयार केला होता.