तुमचे वय १८ ते २१ वर्षे आहे... मग ‘लिव्ह इन’मध्ये राहू शकता: पंजाब हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:01 AM2021-12-22T06:01:37+5:302021-12-22T06:02:19+5:30
उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०१८ च्या निर्णयाशी संबंधित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात सध्या मुलींच्या लग्नाचे किमान वय वाढवण्याची चर्चा सुरू आहे. मुलींचे विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्याचे विधेयक संसदेत मांडण्यातही आले आहे. मात्र पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा कोणताही प्रौढ तरुण विवाह करू शकत नसला तरी तो १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रीच्या संमतीनंतर तिच्यासोबत राहू शकेल.
याचाच दुसरा अर्थ की १८ वर्षांवरील पुरुष वा स्त्री एकमेकांशी विवाह करू शकत नाही. पुरुषांच्या बाबतीत विवाहाचे वय आधीपासून २१ आहे. संसदेने विधेयक संमत केल्यास स्त्रियांच्या बाबतीतही तो निर्णय लागू होईल. पण १८ ते २१ वयोगटामधील स्त्री व पुरुषांना परस्पर सहमतीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मात्र राहता येईल. एकमेकांशी विवाह न करता या वयाचे तरुण व तरुणी एकमेकांसह राहण्यास पंजाब व हरयाणा न्यायालयाच्या एका निर्णयामुळे संमतीच मिळाली आहे.
उच्च न्यायालयाचे हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०१८ च्या निर्णयाशी संबंधित आहे. कोणत्याही प्रौढ व्यक्ती (१८ वर्षांपेक्षा अधिक वय) विवाह न करता एक दांपत्य म्हणून राहू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते.
त्यांना मिळाले संरक्षण
- आपल्या लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे कुटुंबीयांकडून आपल्या जिवाला धोका आहे, असे त्या दोघांनी याचिकेमध्ये म्हटले होते. तसेच त्यांचे कुटुंबीय त्यांची हत्या करतील, अशी भीती त्यांना वाटत असल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते.
- आता त्यांचे लिव्ह इन रिलेशनशिपमधील संबंध न्यायालयानेच मान्य केले आहेत. त्यामुळे मुलगी १८ वर्षांची, म्हणजेच २१ वयाखालील असली तरी तिलाही त्या मुलासह एकत्र राहण्याचा अधिकार मिळाला आहे. पोलीसही त्यांना आता त्रास देणार नाहीत.