Himachal Pradesh Family Drown :हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर अद्याप पाहायला मिळतोय. अशातच हिमालचमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. लग्नासाठी जाणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. अचानक आलेल्या पुरात कार वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला तर काहीजण अद्यापही बेपत्ता आहे. आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेने कुटुंबांच्या नातेवाईंकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पंजाबमधील नवांशहर येथे लग्नासाठी एसयूव्हीमधून प्रवास करणाऱ्या कुटुंबासोबत ही घटना घडली. हिमाचल प्रदेशातील एका कुटुंबातील दहा सदस्य रविवारी होशियारपूर जिल्ह्यातील माहिलपूर ब्लॉकमधील जेजॉन शहराजवळील नाल्यात अचानक आलेल्या पुरात वाहनासह वाहून गेले. कारमधील नऊ जणांचे मृतदेह हाती लागले असून पोलीस बाकीच्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांचे पथक बचाव कार्यात गुंतले असून एका बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.
होशियारपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नाल्याला पूर आला. हे लोक हिमाचलहून पंजाबमधील नवनशहर येथे लग्नाच्या वरातीसाठी जात होते. सर्व लोक एकाच कुटुंबातील आहेत. गाडी रस्त्यावरून जात असताना नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आलं. कार नाल्याला ओलांडून जाईल, असे ड्रायव्हरला वाटले. मात्र अचानक प्रवाह वाढला आणि इनोव्हा कार पुराच्या पाण्यात वाहू लागली. आरडाओरडा ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी इनोव्हामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
स्थानिकांनी तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला. लोकांनी गाडीतील एका मुलाला कसेबसे वाचवले. मात्र गाडीचा दरवाजा न उघडल्याने बाकीचे लोक पुरात वाहून गेले. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून एनडीआरएफच्या टीमला बोलवून घेतले. त्यानंतर शोधाशोध केली असता आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित बेपत्ता लोकांच्या शोधासाठी खोऱ्यात शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसयूव्हीमध्ये एकूण ११ जण प्रवास करत होते. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील मेहतपूरजवळील डेहरा येथील रहिवासी दीपक भाटिया हे आपल्या कुटुंबातील नऊ सदस्यांसह एका लग्नात सहभागी होण्यासाठी नवनशहरला गेले होते. दीपक यांच्यासोबत त्यांचे वडील सुरजीत भाटिया, आई परमजीत कौर, काका सरूप चंद, काकू बंदर आणि शिनो, मुली भावना (१८) आणि अंकू (२०), आणि मुलगा हरमीत (१२) ड्रायव्हर होता.