यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमधील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षाने राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे जालंधरमधील खासदार सुशील कुमार रिंकू आणि जालंधर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार शीतल अंगुराल यांनी आम आदमी पक्षाला राम राम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेते विनोद तावडे यांनी आपच्या या विद्यमान आमदार आणि खासदारांना भाजपामध्ये औपचारिक प्रवेश दिला.
आजच्या पक्षप्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचं बळ आणखी वाढलं आहे. याआधी काँग्रेस नेते आणि खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला होता. भाजपाने नुकताच पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपा आणि शिरोमणी अकाली दलामधील आघाडीबाबतची चर्चा फिस्कटल्यानंतर कालच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती.
स्वबळावर लढण्याची घोषणा करताना सुनील जाखड म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून करण्यात आलेली विकासकामं सर्वांसमोर आहेत. तसेच मागच्या दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांकडील पीक किमान हमीभावामध्ये खरेदी करण्यात आलं, असा दावाही सुनील जाखड यांनी केला आहे.