जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे आयएफच्या ताफ्यावर शनिवारी झालेल्या एका जवानाला वीरमरण आलं होतं. तर चार जवान जखमी झाले होते. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी पुंछमध्ये झालेला हल्ला हा भाजपाला लोकसभा निवडणुकी विजय मिळवून देण्यासाठी केलेला स्टंट असल्याचा दावा केला आहे. चन्नी यांच्या या विधानावरून वादाला तोंड फुटले आहे. तसेच भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी चन्नी यांचं वक्तव्य हे भयानक आणि सैनिकांचा अपमान करणारं आहे, अशी टीका केली आहे.
चरणजीत सिंग चन्न हे जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यासंबंधीत प्रश्नावर उत्तर देताना चन्नी म्हणाले की, ही स्टंटबाजी सुरू आहे. हल्ले होत नाही आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा भाजपाला विजयी करण्यासाठी अशी स्टंटबाजी केली जाते. त्यात सत्य काही नाही, असा दावा चन्नी यांनी केला होता.
जनतेच्या जीवनाशी आणि शरीराशी कसं खेळायचं, याची भाजपाला पुरेपूर जाणीव आहे, असा दावाही चन्नी यांनी केला. दरम्यान, भाजपाने पुंछमधील हल्ल्याबाबत चन्नी यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला आहे. भाजपा नेते मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, काँग्रेसवाले सांगताहेत की, जवानांना निवडणुकीमुळे शहीद करण्यात आले. ही मानसिकता भयावह आणि देशाची सेवा करणाऱ्यांसाठी अपमानक आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि राहुल गांधी एकमेकांना पाठिंबा देत आहेत. काँग्रेस आमच्या जवानांच्या बलिदानाची अवहेलना करत आहे, असा आरोपही सिसरा यांनी केला.