- प्रसाद आर्वीकर
चंडीगड - लोकसभा निवडणुकीत युतीच्या वाटाघाटीत भाजपची डाळ न शिजल्याने भाजप आणि शिरोमणी अकाली दल स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी तेराही जागांवर चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे. या लढतींमध्ये पंजाबमधील सत्तेचा फायदा आम आदमी पार्टी (आप) कसा घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वात प्रथम आपने आपल्या ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे आपचा निवडणुकीतील आत्मविश्वास यातून दिसून आला. दुसरीकडे राज्यात कमी ताकद असतानाही अतिआत्मविश्वास भाजपला नडला. मागील २५ वर्षांपासून अकाली दलासोबत असलेली युती तुटली असून, भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेससह आम आदमी पार्टी, शिरोमणी अकाली दल आणि भाजप असे चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. आपच्या विरोधात होत असलेली कारवाई पंजाबात मात्र सहानुभूतीची लाट वाढविण्यासाठी साह्यभूत ठरत आहे. या जोरावर लाभ उठवित 'दिल्ली' गाठण्याचे स्वप्न सध्या आप रंगवत आहे.
२०१९च्या निवडणुकीत कोणाला किती जागा?काँग्रेस - ८अकाली दल - २भाजप - २आप - १
भाजपसमोर आव्हानराज्यात सर्वात कमी ताकद असतानाही भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा या राज्यात काय परिणाम होतो, याकडे लक्ष राहणार आहे. याशिवाय शेतकरी आंदोलनातून भाजपने शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली आहे. तीन शेतकरी कायदे रद्द न केल्याने शिरोमणी अकाली दलाने भाजपपासून फारकत घेत शेतकऱ्यांची सहानुभूती मिळविली. त्यामुळे भाजपला झगडावे लागणार, असे दिसते.