अमृतसर : ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली तरुणाई आणि दिल्लीमध्ये प्रदुषणाला जबाबदार म्हणून गव्हाचे खांडके जाळण्याची बंदी हे प्रश्न आवासून असलेल्या पंजाबमध्ये यंदा काँग्रेस आणि भाजपामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अकाली दलाकडून काँग्रेसने पंजाबमध्ये सत्ता खेचून आणली होती. यानंतर झालेली कर्जमाफी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर होतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
देशभरात, अगदी दिल्लीतही अरविंद केजरीवाल यांच्या आपने खासदारकीचे खाते उघडले नव्हते. मात्र, पंजाबमध्येआपला गेल्या 2014 च्या निवडणुकीत लॉटरीच लागली होती. हा एकप्रकारचा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस, आकाली दलाला धक्काच होता. एकूण 13 जागांपैकी आपचे 4 खासदार निवडून लोकसभेत गेले होते. तर शिरोमणी अकाली दल 4, काँग्रेस 3 आणि भाजपाला 2 जागा मिळाल्य़ा होत्या. यावेळी काँग्रेसच्या 5 जागा घटत 4 आप आणि 1 जागा भाजपाची वाढली होती. तेव्हा राज्यात अकाली दलाची सत्ता होती.
2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपा-अकाली दलाला धूळ चारत सत्ता काबीज केली होती. एकूण 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळविला होता. तर आपने भाजपा-अकाली दलाला तिसऱ्या क्रमांकावर फेकत 20 जागा जिंकल्या होत्या. अकाली दल 15 आणि भाजपाला केवळ 3 जागा जिंकता आल्या होत्या. यंदा लोकसभेला काँग्रेस आणि अकाली दल-भाजपा यांच्यामध्ये खरी लढत असली तरीही आपही काही चमत्कार करण्याची दाट शक्यता आहे.
सिद्धू फॅक्टर काँग्रेसला धोक्याचा...माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे भाजपातून काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आहेत. आमदारकीची माळही त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. मात्र, त्यांचा पाकिस्तान दौरा आणि वादग्रस्त वक्त्यव्यांचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीवेळी सिद्धू एकमेव भारतीय हजर राहिले होते. यावरून भाजपाने टीकेची झोडही उठविली होती.