लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पंजाबमधून संमिश्र कौल समोर आले आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसने ७, आम आदमी पक्षाने ३ आणि अकाली दलाने एका जागेवर आघाडी घेतली आहे. तर पंजाबमध्ये दोन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. फरिदकोट आणि खडूरसाहीब येथून हे अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे हे दोन्ही अपक्ष उमेदवार हे खलिस्तान समर्थक आहेत.
फरीदकोट लोकसभा मतदारसंघातून सरबजीत सिंग खालसा यांनी आघाडी घेतली आहे. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारा आरोपी बेअंत सिंग याचा पुत्र आहे. तर दुसरीकडे खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून खलिस्तानसमर्थक अमृतपालसिंह याने आघाडी घेतली आहे. हे दोघेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
दरम्यान, फरिदकोट येथून सरबजीत सिंग खालसा यांनी आतापर्यंत २ लाख ९६ हजार ९२२ मतं घेतली असून, ७० हजार २४६ मतांनी ते आघाडीवर आहेत. तर खडूर साहिब येथून अमृपाल सिंग याने आतापर्यंत ३ लाख ६५ हजार १०५ मतं मिळवताना तब्बल १ लाख ७० हजार १५७ हजार मतांची आघाडी घेतली आहे.