अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:51 PM2024-05-17T13:51:20+5:302024-05-17T13:51:55+5:30
Loksabha Election - पंजाबमध्ये ४ प्रमुख पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत आहे. त्यात इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मात्र वेगळे लढतायेत.
जालंधर - लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. आता आगामी ३ टप्प्यातील मतदानासाठी सगळ्याच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आम आदमी पार्टीने दिल्लीत काँग्रेससोबत आघाडी केली मात्र पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणुकीला सामोरे जातायेत. त्याशिवाय दिर्घकाळ मित्र राहिलेले भाजपा आणि शिरोमणी अकाली दलही स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यात शिअदचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी मोठा दावा केला आहे.
पत्रकारांशी बोलताना सुखबीर सिंग बादल म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे लवकरच भाजपासोबत जातील. निवडणूक निकालानंतर ते भाजपासोबत जाऊ शकतात. आता कॅम्पेन जास्त दिवस राहिला नाही असं त्यांनी सांगितले. तर आप आणि शिरोमणी अकाली दलाला मत देणे म्हणजे भाजपाला मत देण्यासारखे आहे असा आरोप काँग्रेसनं केला आहे.
#WATCH | Punjab: Shiromani Akali Dal president Sukhbir Singh Badal says, "Arvind Kejriwal is going to join BJP anytime after elections..." pic.twitter.com/kv3DFuCPGw
— ANI (@ANI) May 16, 2024
आम आदमी पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांना मतदान करणे म्हणजे प्रत्यक्षात भाजपाला मत दिल्यासारखे आहे. हे दोन्ही पक्ष भाजपाला हरवण्याच्या मनस्थितीत नाही. त्यासाठी दोघे भाजपाविरोधी मतदानात फूट पाडणार आहेत. जर तुम्हाला खरेच भाजपाला हरवायचे असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय काँग्रेसला मतदान करणे आहे असं विधान पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी केले आहे.
पंजाबमध्ये कधी होणार मतदान?
पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. याठिकाणी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात म्हणजे १ जून रोजी इथं मतदान पार पडेल. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी केली जाईल. देशातील विविध राज्यात आतापर्यंत ४ टप्प्यातील मतदान झालं आहे.