नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी पंजाबमधील लुधियाना येथील न्यायालयात बॉम्ब स्फोट झाला होता. त्या प्रकरणात आता सुरक्षा यंत्रणांच्या हाती मोठे यश लागले आहे. त्या स्फोटाचा मास्टरमाइंड जसविंदर सिंग मुलतानी (Jaswinder Singh Multani) याला जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. मुलतानी आयएसआयच्या (ISI) सूचनेनुसार काम करत होता.
काही दिवसांपूर्वी लुधियाना न्यायालयाच्या आवारात भीषण स्फोट झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले होते. त्या स्फोटाच्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसविंदर सिंग मुलतानी लुधियाना आणि देशातील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या शिख फॉर जस्टिस (SFJ) या दहशतवादी संस्थेचा सक्रिय सदस्य आहे. सध्या जर्मनीतील यंत्रणा मुलतानीची चौकशी करत आहेत.
रिंदा आणि मुलतानने रचला कटमिळालेल्या माहितीनुसार, लुधियाना बॉम्बस्फोटाची योजना पाक गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानस्थित गँगस्टर हरविंदर सिंग रिंदाने आखली होती. मुलतानची चौकशी करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा लवकरच जर्मनीला जाऊ शकतात. पंजाब पोलिसांचा बडतर्फ हेड कॉन्स्टेबल गगनदीप सिंग याला लुधियाना बॉम्बस्फोटात ह्युमन बॉम्ब म्हणून वापरण्यात आले होते.
मुलतानीवर अनेक आरोपमुलतानी दिल्ली आणि मुंबईतही बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आवाहनावरुन त्याला जर्मनीत अटक करण्यात आली. खलिस्तान समर्थक असण्यासोबतच मुलतानीवर पंजाब सीमेवरुन शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी पाकिस्तानमार्गे भारतात केल्याचाही आरोप आहे.
रिंदावर अनेक गुन्हे दाखलरिंदा हा A+ श्रेणीचा गँगस्टर आहे. पंजाबशिवाय महाराष्ट्र, चंदीगड, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्येही तो वॉन्टेड आहे. त्याच्यावर 10 खून, 6 खुनाचे प्रयत्न आणि 7 दरोडे याशिवाय शस्त्र कायदा, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी असे 30 गुन्हे दाखल आहेत. 2017 मध्ये रिंदा पोलिसांच्या हातून निसटला होता, त्यानंतर तो पाकिस्तानात गेल्याचे निष्पन्न झाले होते.
पंजाबमधील होशियारपूरचा रहिवासी
लुधियानासह भारतातील विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटात मुलतानीचा सहभाग असल्याचा संशय एजन्सीला आहे. जसविंदर सिंग मुलतानी हा पंजाबमधील होशियारपूर येथील मुकेरियाचा रहिवासी आहे. 1976 ला जन्म झालेल्या मुलतानीला दोन भाऊ असून दोघेही जर्मनीत दुकान चालवतात. मुलतानी पाकिस्तानात गेला होता की नाही, याबाबतही एजन्सी त्याच्याकडे चौकशी करत आहेत.
गगनदीप सिंगने केला स्फोट
24 डिसेंबरला लुधियाना कोर्टात स्फोट झाला होता. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. स्फोटाच्या तपासानंतर गगनदीप सिंग असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गगनदीपला कोर्टाची रेकॉर्ड रुम उडवायची होती, असे पोलिसांनी सांगितले. तो पंजाब पोलिसांचा बडतर्फ हवालदार आणि ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपीही होता.