पटियाला : पंजाबमधील भीषण पुराने शेकडो घरांची नासधूस केली, तर दुसरीकडे एका घरात आनंद आणण्याचे कामही केले. पूर बचाव कार्यात स्वयंसेवक म्हणून कार्यरत असलेल्या जगजीत सिंग (३७) यांना ३५ वर्षांनी त्यांच्या आईला भेटण्याचे भाग्य लाभले. वडिलांचे निधन झाले तेव्हा जगजीत सहा महिन्यांचे होते. आई हरजीतने दुसरं लग्न केलं आणि त्याचे आजी-आजोबा त्याला दोन वर्षांचा असताना घेऊन गेले. तो मोठा झाल्यावर त्याच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्याला सांगण्यात आले.
जगजीत २० जुलै रोजी पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेच्या वतीने पटियाला येथे गेले होते. तेव्हा त्याच्या एका आत्याचा फोन आला आणि तुझे आजोबा (आईचे वडील) कदाचित तेथील बोहरपूर गावात राहायचे असे ती म्हणाली. तो लगेच त्या गावी गेला, घर शोधले आणि आजी प्रीतम कौरला भेटला.
मीच तो दुर्दैवी मुलगा आजीने त्यांची मुलगी हरजीत कौर हिचे लग्न कर्नाल येथे झाले होते, पण तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. त्यांना सोनू नावाचा मुलगाही होता, असे सांगितल्यावर आपणच सोनू, तो दुर्दैवी मुलगा आहे जो तीन दशकांहून अधिक काळ आपल्या आईला पाहू शकला नाही, असे जगजीत म्हणाले आणि घरातील वातावरण पूर्णपणे भावुक झाले. मग तो पायाच्या आजारामुळे नीट चालता येत नसलेल्या वृद्ध हरजीत कौर अर्थात आईसमोर गेला. दोघांनाही भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही, गळाभेट घेतली.