पंजाब : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच संकट काळात संपूर्ण देश अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पंजाब पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, पंजाब सरकारने आता शनिवार व रविवार आणि कोणत्याही सुट्टीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. ज्यामध्ये आवश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही. म्हणजेच, शनिवार आणि रविवारी पंजाबमध्ये संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.
पंजाबच्या सीमा पुन्हा एकदा सील केल्यानंतर पंजाबची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये आंतरराज्यीय बससेवा बंद करण्यात येईल. फ्लाइट, ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांना आता १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावे, लागणार आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्तकरून प्रवासाच्या इतिहासातून समोर आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. कोरोनाशी सामना करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी विविध विभाग अधिकारी आणि मंत्र्यांच्या गट समितीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोरोनावर मात करण्यासाठी येत्या काही दिवसांत कठोर निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात आला होता.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना असे वाटते की, दिल्लीत सतत वाढणार्या कोरोना रुग्णांचा परिणाम पंजाबमध्येही होऊ शकतो. कारण, दररोज सरासरी ५०० ते ८०० वाहने दिल्लीतून पंजाबकडे येत आहेत. अशा परिस्थितीत पंजाब सरकार विचार करीत आहे की, कोरोनाची चाचणी दिल्ली आणि इतर राज्यातून पंजाबमध्ये येणाऱ्या लोकांसाठी अनिवार्य करावी. मात्र, याबाबत पंजाब पोलीस, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत देशात तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अनलॉकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणारकोरोना व्हायरस लॉकडाऊनमधून देश बाहेर पडत असताना आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी हे १६ व १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी दोन टप्प्यांत संवाद साधणार आहेत. त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी १७ रोजी संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या महामारीचा उद्रेक झाल्यानंतर पंतप्रधानांची ही मुख्यमंत्र्यांशी चर्चेची सहावी फेरी असेल. यापूर्वी त्यांनी ११ मे रोजी संवाद साधला होता.