होशियारपूर: पंजाबच्या होशियारपूरमधील गड्डीवाला भागातील बैरामपूर गावात 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षीय हृतिकचा दुर्दैवी अंत झाला आहे. कुत्रा मुलाच्या मागे धावल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी मुलगा पळ सुटला होता, यावेळी अचानक तो बोअरमध्ये पडला. सकाळपासून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गड्डीवाला भागातील शेतात चिमुकल्याचे आई-वडील काम करत होते. यादरम्यान, एक कुत्रा त्याच्या मागे लागला आणि जीव वाचवण्यासाठी चिमुकला धावत सुटला. यावेळी अचानक तो बोअरमध्ये पडला. 200 फूट खोल बोअरवेलच्या शंभर फुटावर तो अडकून पडला. साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या मुलाला बाहेर काढता आले. मुलाला बाहेर काढताच त्याला थेट रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
मुलाला वाचवण्यासाठी एन.डी.आर.एफ. पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच, लष्कराचीही मदत घेण्यात आली होती. चिमुकल्याला बाहेरही काढण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.