Punjab Election 2022: पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल?; ओपिनियन पोलमधून काँग्रेसला धक्का तर 'आप'ला फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:18 PM2022-01-20T21:18:10+5:302022-01-20T21:19:29+5:30
काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना ३१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले. काँग्रेसनं याठिकाणी सत्ता टिकवण्यासाठी रणनीती आखली आहे तर इतर पक्षही काँग्रेसला धक्का देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंजाब निवडणुकीत कोण बाजी मारणार? याचीच चर्चा सध्या सुरु आहे. त्यात झी मीडिया आणि डिजाइन बॉक्स्डनं केलेल्या ओपिनियन पोलमध्ये आकडे पाहून काँग्रेसमध्ये चिंता पसरण्याची शक्यता आहे.
या ओपिनियन पोलनुसार, सर्व्हेत १२ लाख लोकांची मतं मागवण्यात आली होती. १० डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या कालावधी दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला होता. हा केवळ ओपिनियन पोल आहे. त्यात केवळ लोकांचा कौल विचारुन अंदाज वर्तवण्यात आले आहेत. या सर्व्हेनुसार काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना ३१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. त्याखाली आम आदमी पक्षाच्या भगवंत मान यांना २४ टक्के लोकांना मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली आहे तर शिरोमणी अकाली दलचे सुखबीर बादल यांना २२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग ८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
ओपिनियन पोलनुसार कुणाला किती टक्के मते मिळतील?
काँग्रेस – २९ टक्के
शिरोमणी अकाली दल – २६ टक्के
आम आदमी पक्ष – ३६ टक्के
भाजपा – ४ टक्के
अन्य – ५ टक्के
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३७ टक्के मतदान झाले होते. त्यात ८ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. शिरोमणी अकाली दलाच्या मतदानाच्या टक्केवारीत फारसा बदल नाही. २०१७ मध्येही त्यांना २६ टक्के मतदान झालं होतं. तर विशेष म्हणजे आम आदमी पक्षाला २०१७ मध्ये २७ टक्के मतदान झाले होते त्यात यंदाच्या निवडणुकीत मोठी वाढ होताना दिसत आहे. भाजपाच्या मतदान टक्केवारीतही १ टक्क्यांनी वाढ होताना दिसत आहे.
२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला मालवा ४०, माझा २२ आणि दोओब येथे १५ जागांवर विजय मिळाला होता. पंजाब तीन भागात विभागलं आहे. माझा, दोआब आणि मालवा. त्यात मालवा येथे सर्वाधिक ६९ विधानसभा जागा आहेत. तर माझा येथे २५ आणि दोआब येथे २३ विधानसभा जागा आहेत. पंजाबमध्ये त्रिशंकु सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंजाबच्या ओपिनियन पोलमध्ये कुणाला किती जागा?
आम आदमी पक्ष – ३६-३९
काँग्रेस – ३५-३८
शिरोमणी अकाली दल – ३२-३५
भाजपा – ४-७
इतर २-४