FIR Against Bajinder Singh:पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील प्रसिद्ध ख्रिश्चन धर्मगुरु बजिंदर सिंग यांच्यावर एका २२ वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा खळबळजनक आरोप केला आहे. याप्रकरणी बजिंदर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पीडितेने बजींदर सिंग तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा आणि अश्लील मेसेज पाठवायचा असा आरोप केला. तरुणीच्या आरोपानंतर संपूर्ण या प्रकरणाची पंजाबमध्ये चर्चा सुरु आहे.
कपूरथला येथील धर्मगुरु बजिंदर सिंग यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कपूरथला इथल्या तक्रारदार तरुणीने सांगितले की, फादर बजिंदर सिंग जालंधरच्या ताजपूर गावात चर्च ऑफ ग्लोरी अँड नावाचा ख्रिश्चन सत्संग चालवतात. यापूर्वी बजिंदर सिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहेत. सिंग यांना २०१८ मध्ये बलात्काराच्या एका प्रकरणात अटकही झाली होती.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, बजिंदर सिंग हा मी १७ वर्षांची असल्यापासून माझे शोषण करत होता. सिंगने मला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि विवाहित असूनही माझ्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला. एवढेच नाही तर बजिंदर सिंगने माझा पाठलाग करून कुटुंबाला मारण्याची धमकी दिली. मुलीच्या तक्रारीनंतर कपूरथळा पोलिसांनी बजिंदर सिंगविरुद्ध आयपीसी कलम ३५४-ए, ३५४-डी आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुणीचे पालक ऑक्टोबर २०१७ मध्ये बजिंदर सिंगच्या चर्चमध्ये जाऊ लागले. तिथे बजिंदरने तरुणीचा फोन नंबर घेतला आणि तिच्याशी फोनवरुन बोलण्यास सुरुवात केली आणि मेसेजही पाठवू लागला. तरुणी तिच्या पालकांना हा सगळा प्रकार सांगण्यास घाबरत होती. यानंतरही फोनवर तिला चुकीचे मेसेज येणं सुरुच होतं. त्यानंतर २०२२ मध्ये, बजिंदर सिंगने एका रविवारी मला चर्चच्या केबिनमध्ये एकटे बसवायला सांगितले. बजिंदर सिंग केबिनमध्ये यायचा आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, असं पीडित तरुणीने सांगितलं. जर तिच्या कुटुंबासोबत काही चुकीची घटना घडली तर त्याला पास्टर बजिंदर सिंग जबाबदार असतील, असंही तरुणीने म्हटलं.
दरम्यान, यापूर्वीही बजिंदर सिंगविरोधात गंभीर आरोप करण्यात आले होते. २०१८ मध्ये बजिंदरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिरकपूर येथील महिलेने त्याच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. बजिंदरने लैंगिक छळाचा व्हिडिओ बनवून धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला होता. या प्रकरणी बजिंदरविरुद्ध लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती. त्यानंतर अटक झाल्यानंतर महिलेने आपलं म्हणणं मागे घेतलं होतं.