चंदीगड : पंजाब पोलिसांनी होशियारपूर जिल्ह्यातून खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या दोघांना अटक करून या दहशतवादी संघटनेच्या शाखेचा पर्दाफाश केला.अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे माखन सिंग गिल ऊर्फ अम्ली आणि देविंदर सिंग ऊर्फ हॅपी, अशी आहेत. दोघेही होशियारपूर जिल्ह्यातील नुरपूर जट्टन या गावाचे आहेत, असे पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी सांगितले. या दोघांकडून एक मशीन गन, एक पिस्तूल, ६० जिवंत काडतुसे, एक सफेद कार, चार मोबाईल फोन आणि इंटनरनेट डोंगल जप्त करण्यात करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. दहशतवादी हल्ले करून खलिस्तानवाद्यांच्या काही राज्यातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडविण्याच्या कारस्थानाबाबत माहिती मिळाली होती. या दोघांची अटक, हे या मोहिमेचे यश आहे. कॅनडास्थित हरप्रीत सिंग याच्या संपर्कात आम्ही होतो. त्याने आम्हाला पंजाबात हत्याकांड घडविण्यासाठी राज्यात या संघटनेची शाखा स्थापन करण्यासाठी चिथावणी दिली होती, अशी माहिती माखनने प्राथमिक चौकशीत दिली, असे गुप्ता यांनी सांगितले.बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेचा म्होरक्या वाधवा सिंगचा पूर्वी जवळचा साथीदार असलेल्या माखनने दिलेल्या माहितीनुसार खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा कॅनडास्थित सदस्य हरप्रीत वारंवार पाकिस्तानला जायचा. तो पाकिस्तानस्थित खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा म्होरक्या रणजीत सिंग ऊर्फ नीता याचा निकटचा सहकारी आहे.विदेशातून माखनला निधी पाठविणाऱ्यांत जर्मनी आणि अमेरिकास्थित दहशतवादी संघटनाच्या हस्तकांची नावे समोर आली आहेत. माखनला पंजाब पोलिसांनी यापूर्वी भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यात अटकही केली होती, असे गुप्ता यांनी सांगितले.
खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 12:44 AM