चंदिगड - पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावण्यात पंजाबपोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जवानासह तीन जणांना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवरून जीपीएस आधारीत ड्रोनच्या मदतीने अंमली पदार्थ आणि शस्त्रांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चीनी बनावटीचे दोन ड्रोन, 12 ड्रोन बॅटरी, ड्रोन कंटेनर, इन्सास रायफल काडतूसे, दोन वॉकी-टॉकी सेट, मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थासह सहा लाख 22 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच पत्रकार परिषदेत जप्त करण्यात आलेल्या ड्रोनचे फोटो दाखवण्यात आले आहेत.
अमृतसर आणि करनाल येथून दोन ड्रोन जप्त करण्यात आले असून सध्या एका आरोपीचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका जवानाचा देखील समावेश आहे. राहुल चौहान असं अटक केलेल्या जवानाचं नाव असून तो भारतीय लष्करात नायक हुद्यावर कार्यरत होता. अंमली पदार्थांच्या तस्करीसह पिस्तूल आणि अन्य छोट्या शस्त्रांची तस्करी ड्रोनने झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. राहुल चौहान ड्रोनचा वापर करण्याचे प्रशिक्षण देत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणात अमृतसरमधील धनोआ कुर्द गावातील धर्मेंद्र सिंग आणि अमृतसर जिल्ह्यातील बालकर सिंग यांना अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) वडोदरा येथून आयसिसच्या एका दहशतवाद्याला अटक केल्याची घटना समोर आली होती. जफर अली असं मुसक्या आवळलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. जफरला वडोदऱ्यातील गोरवा परिसरातून अटक करण्यात आली. जफर हा तामिळनाडूत वॉन्टेड होता. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून जफर वडोदऱ्यात आयसिसच्या मोड्युलचे प्रसार करण्यासाठी आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार
गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी
CAA : केंद्र सरकारची अधिसूचना जारी, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू
ट्रक-बसची भीषण टक्कर होऊन लागली आग, 20 जणांचा होरपळून मृत्यू, 21 जण जखमी
कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...