चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात शनिवारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारामध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. तसेच, तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी आपल्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती पंजाबच्या पोलीस महासंचालकांना केली आहे.
तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी तक्रारीचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये म्हटले की, "पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविरोधात गुरुद्वारा दमदमा साहिबमध्ये मद्यधुंद अवस्थेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मी डीजीपी पंजाब आणि राज्य पोलिसांना माझ्या तक्रारीवर कारवाई करण्याची विनंती करतो."
काय आहे प्रकरण?पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते भगवंत सिंग मान हे बैसाखीच्या मुहूर्तावर मद्यधुंद अवस्थेत 14 एप्रिलला तख्त दमदमा साहिबमध्ये दाखल झाले होते, असा आरोप शुक्रवारी पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि चंडीगडमधील शीख धर्मस्थळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने केला होता. तसेच, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही संघटनेने केली होती.
मुख्यमंत्र्यांनी मद्यधुंद अवस्थेत शीख समुदायाच्या अत्यंत प्रतिष्ठित अध्यात्मिक स्थळाला भेट दिली आणि शीख राहत मर्यादेचे (आचारसंहिता) उल्लंघन केले, असे एसजीपीसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष रघुजित सिंग विर्क म्हणाले. एसजीपीसीने मुख्यमंत्री भगवंत मान यांना त्यांची चूक मान्य करून संपूर्ण शीख समुदायाची माफी मागावी असे म्हटले आहे.
बग्गा यांच्याविरुद्ध सुद्धा पंजाबमध्ये गुन्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंग बग्गा हे अनेकदा वादात सापडतात. मोहालीतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये बग्गा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचा आणि धर्म आणि जातीच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधला होता. बग्गा यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना काश्मिरी पंडितविरोधी म्हटले होते.