नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये पोलिसांनी एक तरुणीसोबत केलेली क्रूर कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये ही संतापजनक घटना घडली असून पोलिसांवर टीकेची झोड उठवली जात आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या एका तरुणीच्या तोंडात कपडा कोंबल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. पंजाबमधील संगरूरमध्ये पोलिसांनी काही तरुणींचं तोंड पकडण्याचा प्रयत्न केला.
आंदोलन करणाऱ्यांना ओढत पोलिसांच्या गाडीमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेलं. ही संपूर्ण घटना मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या संगरूरमधील रॅलीदरम्यान घडली. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या रॅलीला विरोध करणाऱ्या बीएड टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पात्र शिक्षकांना पोलिसांच्या क्रूरतेचा सामना करावा लागला आहे. पंजाबमधील संगरूरमध्ये पोलिसांनी आंदोलक तरुणींचे तोंड बंद केले आणि त्यांना जीपमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेले.
तोंडात कापड कोंबलं, ओढत पोलीस ठाण्यात नेलं
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये घोषणाबाजी करणाऱ्या शिक्षकांना पोलीस रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि पंजाब सरकारचा धिक्कार करत घोषणाबाजी करताच पोलीस तोंडात कपडा कोंबताना दिसले. काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असलेल्या महिला आंदोलकाला पोलीस तिच्या कपड्यांसह ओढताना दिसले. यानंतर महिला पोलिसांच्या गाडीमध्ये इतर अनेक आंदोलकांसह दिसली. एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला आतमध्ये ढकलून खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.