अमृतसर - कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा जम्मू काश्मीरमधील कमांडर झाकीर मुसा हा अमृतसरमध्ये दिसल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे. मूसा अमृतसरमध्ये दिसल्याचे कळल्यानंतर पंजाब पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली असून, ठिकठिकाणी झाकीर मूसा याची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच गुप्तचर विभागाने काश्मीर खोऱ्यात झाकीर मूसा आणि हिजबूलचे दहशतवादी मिळून हल्ला करण्याची योजना आखत असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर हिज्बुलचे दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे दिसले होते. गुरुदासपूरचे एसएसपी स्हरनदीप सिंह यांनी सांगितले की, ''झाकीर मूसा हा अमृतसरजवळ असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे आम्ही लोकांना सतर्क करण्यासाठी त्याचे पोस्टर लावले आहेत. झाकीर मुसाबाबत कुठलीही माहिती असेल, तर त्यांनी अशी माहिती पोलिसांनी द्यावी. जैश ए मोहम्मदचे दहशतवादी फिरोझपूरमधून पंजाबमध्ये दाखल होणार असल्याची आम्हाला मिळाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही अनेक उपाय केले आहेत. अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.''
तसेच पंजाबच्या डीजीपींनी राज्यातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकेबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश पंजाब पोलिसांना दिले आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर बीएसएफ आणि पोलीस दलाकडून मिळून लक्ष ठेवण्यात येत आहे. काल पठाणकोटच्या माधोपूर भागात चार संशयितांनी एक एसयूव्ही कार बंदुकीचा धाक दाखवून पळवून नेल्याची घटना घडली. त्यातच आता दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आल्यानं संपूर्ण राज्यातील पोलीस दलाला सतर्कतेचा इशारा देण्याचा आला आहे.