नवी दिल्ली : पंजाब पोलीस (Punjab Police) बुधवारी सकाळी घरी पोहोचल्याचा दावा आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) माजी नेते कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी ट्विट करून केला आहे. यासंदर्भात त्यांनी काही फोटोही ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये कुमार विश्वास यांनी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर निशाणा साधत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना इशारा दिला आहे.
दरम्यान, कुमार विश्वास यांच्या घराबाहेर काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे त्यांनी ट्विट केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे. ट्विटद्वारे कुमार विश्वास म्हणाले, "सकाळी सकाळी पंजाब पोलिस दारात आले आहेत. एकेकाळी माझ्याद्वारे पार्टी सामील केलेल्या भगवंत मान यांना इशारा करतो की, दिल्लीत बसलेला माणूस, ज्याला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, तो एक दिवस तुमचा आणि पंजाबचाही विश्वासघात करेल. देशाने माझा इशारा लक्षात ठेवावा."
निवडणुकीदरम्यान कुमार यांनी केजरीवाल यांच्यावर केले गंभीर आरोपपंजाबमधील निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. अरविंद केजरीवाल यांनी देश तोडण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले होते. याशिवाय, अरविंद केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांच्या पाठिंब्याने सरकार बनवायचे होते, असा आरोप कुमार विश्वास यांनी केला होता. तसेच, याबाबत कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडे उत्तरही मागितले होते.
केजरीवालांचा पटलटवारदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या आरोपांना उत्तर देताना केजरीवाल म्हणाले होते की, शाळा आणि रुग्णालये बांधणारा कदाचित तो जगातील सर्वात गोड दहशतवादी असेल. पंजाबमध्ये 'आप'चा विजय पाहून भाजप, काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे ते म्हणाले होते.
मोहाली क्राईम सेलमध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूअरविंद केजरीवाल आणि आप यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल पंजाब पोलिसांकडून मोहालीतील सायबर क्राइम सेलमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. आतापर्यंत भाजप नेते तेजिंदर बग्गा, नवीन कुमार जिंदाल आणि प्रीती गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कुमार विश्वास यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.