नवी दिल्ली - पंजाबमध्ये गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर राजकारण तापलेलं पाहायला मिळालं. एकीकडे काँग्रेस सरकार राज्यातील आप सरकारवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. "अरविंद केजरीवाल दिल्लीतून दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात" असा गंभीर आरोप सुखबीर सिंग यांनी केला आहे.
सुखबीर सिंग बादल यांनी आपवर टीकास्त्र सोडलं आहे. "पंजाबमधील सरकार अरविंद केजरीवाल दिल्लीतून चालवतात. केजरीवाल दर आठवड्याला भगवंत मान यांना दारूचे बॉक्स पाठवतात आणि तुम्ही सरकारी कार्यालयात बसून मजा करा. सरकार मी चालवतो असं केजरीवाल मान यांना म्हणतात" असं सुखबीर सिंग बादल यांनी म्हटलं आहे. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूलाही आप सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आप सरकारने सिद्धू मुसेवालाची सुरक्षा काढून घेतली त्यामुळे त्याचे शत्रू सावध झाले आणि त्याने जीव गमावला असं देखील बादल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन हे देशभक्त आहेत. तसेच मोहल्ला क्लिनिक मॉडेलचे शिल्पकार म्हणून त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले जावे, अशी मागणी केली होती. "सत्येंद्र जैन यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. सगळ्यांना त्याची चौकशी करू द्या. सीबीआयने त्याची चौकशी करून त्याला क्लीन चिट दिली आहे. आता ईडी लवकरच त्यांना सर्व आरोपातून मुक्त करेल. जैन यांनी मोहल्ला क्लिनिक आणून एक आदर्श ठेवला आहे, त्यांचे काम पाहण्यासाठी बाहेरून लोक येतात. त्यांना पद्मविभूषण देण्यात यावे" असं म्हटलं होतं.