चंदिगढ - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर टीका करणारे पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी चहुबाजूंनी कोंडी झाल्यानंतर बचावात्मक पवित्रा घेतला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह हे आपल्यासाठी वडिलांसारखे असून, सध्या निर्माण झालेला वाद त्यांच्याशी भेट घेऊन मिटवू, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.
अमरिंदर सिंह यांचा विरोध असतानाही करतारपूर कॉरिडॉरच्या पाकिस्तानमधील भूमीपूजनासाठी गेलेल्या सिद्धू यांनी राहुल गांधी हेच आपले कॅप्टन आहेत असे सांगत कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावार टीका केली होती. सिद्धू यांच्या या वक्तव्यानंतर पंजाबमधील राजकारण तापले होते. तसेच अमरिंदर सिंह यांचे निकटवर्तीय असलेल्या मंत्र्यांनी सिद्धूविरोधात आघाडी उघडली होती. सिद्धू यांनी अमरिंदर सिंह यांची माफी मागावी, अशी मंत्र्यांची मागणी आहे. तसेच पंजाब कॅबिनेटच्या बैठकीत सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी होण्याचीही शक्यता आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर केलेली टीका भोवल्यानंतर नवज्योत सिंह सिद्धू बॅकफूटवर आले आहेत. या प्रकरणावर ते म्हणाले की, मळलेले कपडे सगळ्यांसमोर धुवू नयेत, कॅप्टन अमरिंदर सिंह माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत. मी त्यांचा आदर करतो. त्यामुळे या प्रकरणी मी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हा वाद मिटवेन." मात्र या प्रकरणी माफी मागण्यास मात्र सिद्धू यांनी नकार दिला आहे. दरम्यान, सिद्धू हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांना वडिलांसारखे मानतात, असे सिद्धू यांच्या पत्नीने म्हटले आहे.