नवी दिल्ली: काँग्रेसशासित पंजाब आणि राजस्थानमधील बलात्कारांच्या घटनांवरून निशाणा साधणाऱ्या भाजप नेत्यांना राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही उत्तर प्रदेशप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील बलात्काराच्या घटना लपवत नसल्याचं म्हणत राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. पंजाब, राजस्थानातल्या पीडितांना न्याय मिळत नसेल तर मी तिथेही जाईन, असं राहुल यांनी म्हटलं आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये एका सहा वर्षीय दलित मुलीची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली. त्यावरूव भाजपनं काँग्रेसवर टीका केली होती.काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी राजकीय सभा घेण्याऐवजी पीडित कुटुंबाची भेट घ्यायला हवी होती, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी म्हटलं होतं. राहुल यांनी उत्तर प्रदेशातल्या हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. जावडेकर यांच्या टीकेला राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. 'उत्तर प्रदेशाप्रमाणे पंजाब, राजस्थानमधील सरकारं मुलीवर बलात्कार झाल्याचं अमान्य करत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात नाहीत आणि न्यायाचा मार्ग रोखतही नाहीत. तिथल्या सरकारांनी असं केल्यास मी न्यायासाठी तिथेही जाईन,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंजाब, राजस्थानची सरकारं उत्तर प्रदेशप्रमाणे बलात्कार लपवत नाहीत- राहुल गांधी
By कुणाल गवाणकर | Published: October 25, 2020 8:05 AM