अमृतसर: पंजाब विधानसभा निवडणुकीत(Punjab Assembly elections) प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर आम आदमी पार्टीने (AAP) राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Elections) तयारी सुरू केली आहे. पंजाबच्या 5 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपणार आहे. या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असून, आपने क्रिकेटर हरभजन सिंग, आपचे दिल्लीतील आमदार राघव चढ्ढा, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे चांचलर अशोक मित्तल आणि आपचे 'चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे डॉ. संदीप पाठक आणि उद्योगपती संजीव अरोरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
हरभजन सिंगने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या राजकारणात येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर, पंजाब विधानसभेत मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिल्लीचे आमदार राघव चढ्ढा आणि संदीप पाठक यांनाही राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरू होती. संदीप पाठक यांना आपचे चाणक्य म्हणून ओळखले जाते. पंजाबमध्ये पक्षाच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता.
सलग तीन वर्षे पंजाबमध्ये राहून त्यांनी बूथ स्तरापर्यंत संघटना उभारली आहे. ते आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या जवळचे मानले जातात. आपकडून अशोक मित्तल यांच्या नावावरही शिक्कामोर्तब केले आहे. ते लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आहेत. मित्तल हे शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात. याशिवाय, उद्योगपती संजीव अरोरा यांचेही नाव जवळपास निश्चित आहे.
'आप'चे 5 उमेदवार निश्चित
आपचे चार उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहेत. पंजाबमधून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चढ्ढा यांच्याशिवाय प्राध्यापक संदीप पाठक यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. याशिवाय क्रिकेटपटू हरभजन सिंगही पंजाबमधून राज्यसभेचा उमेदवार असेल. याशिवाय लव्हली विद्यापीठाचे कुलपती अशोक कुमार मित्तल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राघव चढ्ढा यांची राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांचे वय 33 वर्षे आहे. जर चड्ढा राज्यसभेत पोहोचले तर ते देशातील सर्वात तरुण राज्यसभा खासदार असतील. पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा 'आप'ने जिंकल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत 'आप' 5 जागा जिंकू शकेल, असे मानले जात आहे.