चंदीगड : कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांतर्गत 26 जानेवारी रोजी दिल्लीतशेतकरी ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या तयारीत आहेत. यावरून वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. कारण, पंजाबमधील दोन गावांनी ट्रॅक्टर मोर्चात सहभाग न घेणाऱ्यांना दंड लावण्याची घोषणा केली आहे. ही गावे मोगा येथील राउक कलां आणि संगरूरमधील भल्लरहेडी आहेत.
संगरूरमधील भल्लरहेडी गावाने २१०० रुपये दंड आकारला आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर मोर्चात भाग घेणार नाहीत, अशा लोकांकडून १२०० रुपयांचा दंड मोगामधील राउक कलां या गावात वसूल करण्यात येणार आहे. संगरूरमध्ये ही घोषणा गुरुद्वारा गावातील भारतीय किसान युनियन (राजेवाल) गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. यावेळी ट्रॅक्टर मार्चमध्ये सामील न झालेल्या कुटुंबाला २१०० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष जसबरसिंग, अवतार सिंग आणि भूपेंद्र सिंग यांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत ही वादग्रस्त घोषणा केली. 'जे लोक ट्रॅक्टर मोर्चमध्ये सामील होणार नाहीत, त्यांना त्यांना २१०० रुपये दंड भरावा लागणार आहे, असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. तुम्ही त्याला दंड किंवा डिझेल खर्चासाठी दिलेल्या योगदान म्हणू शकतो. मात्र, निर्णय अंतिम आहे,' असे म्हटले आहे. तसेच, जे मोर्चमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांना भविष्यात शेतकरी संघटनेचे कोणतेही सहकार्य मिळणार नाही, असेही बीकेयू नेत्यांनी सांगितले आहे.
भल्लेहरी गावातून मार्चसाठी शंभर ट्रॅक्टर पाठविण्यात येणार आहे. दुसरीकडे, मोगा येथील राउक कलां या गावातल्या शेतक्यांना ट्रॅक्टर मोर्चसाठी प्रति एकर १०० रुपये देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, आम्हाला ट्रॅक्टर मार्चमध्ये सामील होऊन हा मार्च यशस्वी करायचा आहे आणि या गावातून ८०० हून अधिक ट्रॅक्टर मार्चमध्ये असतील, अशी अपेक्षा आहे, असे शेतकरी नेते गुरनाम सिंग यांनी सांगितले.
याचबरोबर, गुरनाम सिंग म्हणाले की, जे मार्चमध्ये सामील होण्यास नकार देतात त्यांना १२०० रुपये द्यावे लागतील. दरम्यान, स्वयंसेवक मोठ्या संख्येने लोकांना मोर्चात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. प्रत्येक कुटूंबातील किमान एका सदस्याला ट्रॅक्टर मोर्चला पाठिंबा देण्यास सांगितले जात आहे. पंजाबमधील अनेक गावात महिलांना ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.