नवी दिल्ली - भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ बमियाल सेक्टरमध्ये रविवारी (15 एप्रिल)रात्रीपासून भारतीय लष्कराला संशयास्पद हालचाली निदर्शनास येत आहेत. संशयितांमध्ये आत्मघातकी हल्ले करणाऱ्या संघटनांतील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पठाणकोट एअरबेसजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, परिसरामध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. शिवाय, दहशतवादी हल्ले रोखण्यासाठीही रणनीतीदेखील आखण्यात येत आहे.
आयजी बॉर्डर रेंज सुरिंदर पाल सिंह परमान व पठाणकोटचे एसएसपी विवेकसोनी यांनी संपूर्ण परिस्थितीवर नजर ठेवली असून शोधमोहीमेवरही त्यांची देखरेखीअंतर्गत सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी मुस्कान अली नावाच्या व्यक्तीकडून ऑल्टो कार पळवली. त्यानंतर ही कार गावातील एक ठिकाणी सोडून दिली. दोनपेक्षा अधिक संशयित परिसरात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रदेखील आहेत. या संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे. परिसरात नाकेबंदीदेखी करण्यात आली आहे. एसएसपी विवेकशील सोनी यांनी सांगितले की, ''पोलीस कोणत्याही प्रकार धोका पत्करू शकत नाहीत. त्यामुळे ज्या काही संशयित हालाचाली आढळून आल्या आहेत, त्यामागे दहशतवादी संघटना असल्याचा संशय आहे.''