चंदीगड:पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आता केवळ दंड भरावा लागणार नाही, तर चुकीची पुनरावृत्ती केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. यासोबतच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल आणि त्या व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात समाजसेवा करावी लागेल किंवा एक युनिट रक्तदान करावे लागेल.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
पंजाब सरकारने वाहतुकीच्या नियमात केलेले बदल सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणी वाहतुकीचा नियम मोडला तर त्याला रिफ्रेशर कोर्स करावा लागेल, असे नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर परिवहन प्राधिकरणाकडून प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर किमान 20 शालेय विद्यार्थ्यांना दोन तास वाहतुकीचे नियम शिकवावे लागणार आहेत. याशिवाय, सामान्य शिक्षा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ओव्हरस्पीडिंग, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे, दारू पिऊन गाडी चालवणे, ट्रिपल रायडिंग आणि सिग्लन तोडणे, यांचा समावेश आहे.
उल्लंघन केल्यास किती दंडओव्हरस्पीडिंगवर आता पंजाबमध्ये 1000 रुपये दंड आकारला जाईल. जर कोणी या नियमाचे वारंवार उल्लंघन करताना आढळले तर दंड दुप्पट केला जाईल. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवल्यास, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्यास 5000 रुपये दंड आकारला जाईल. या नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल. ओव्हरलोड वाहनांवर प्रथमच 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा दुप्पट दंड भरावा लागेल. याशिवाय, पहिल्यांदा सिग्लन मोडल्यास किंवा ट्रिपल रायडिंग केल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाईल. पुन्हा नियमाचे उल्लंघन केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल.
पंजाबमधील वाहतुकीची स्थिती काय आहेवाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पंजाब सरकारने पोलिसांना ट्रॅफिक बॅरिअर्स बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पंजाबमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन सामान्य बाब झाली आहेय येथे दररोज 13 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. 2011-2020 दरम्यान पंजाबमध्ये 56,959 हून अधिक अपघात झाले. ज्यामध्ये 46,550 लोकांचा मृत्यू झाला होता.