Punjab Assembly Election 2022 : पंजाब देणार प्रस्थापितांना धक्का; काँग्रेस अन् ‘आप’मध्ये टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 08:50 AM2022-02-08T08:50:31+5:302022-02-08T08:50:53+5:30
काँग्रेसने निवडणुकीच्या चार महिने आधी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून जनतेचा रोष कमी केला, त्यातच चन्नी यांनी १११ दिवसांत ५० मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णयांचा धडाका लावल्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.
यदु जोशी -
चंडीगड : गेली दोन दशके प्रस्थापित घराण्यांची सत्ता अनुभवलेला पंजाब यावेळी मात्र प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदरसिंग या दोन्ही प्रस्थापितांना खो देताना दिसत आहे. मुख्य लढत ही काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये होत असून किसान आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे किसान आंदोलनात अत्यंत सक्रिय राहिलेल्या संयुक्त समाज मोर्चाची निवडणुकीतील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहील असे मानले जात आहे. बादल यांचा शिरोमणी अकाली दल स्वबळावर लढत आहे. भाजप-अमरिंदसिंग यांची पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव ढिंढसा यांचा अकाली दल संयुक्त या तीन पक्षांची युती आहे. आम आदमी पार्टीने काँग्रेसची झोप उडविली आहे. नवमतदार, बदल हवा असलेला मतदार ‘आप’ला पसंती देताना दिसत आहे.
‘आप’ची पाटी कोरी आहे. सगळ्या प्रस्थापितांची कुठे ना कुठे हात मिळवणी आहे, आम्ही तुम्हाला दमदार उत्तम पर्याय देणार असे या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान सांगत आहेत. आप सोडून सगळेच प्रस्थापित असून ते एकमेकांची पापं झाकत राहतील. पंजाबमध्ये स्वच्छ सरकार हवे असेल तर आपकडे चला अशी भावना येथील मतदार व्यक्त करताना दिसतात. बरेच जण ‘आप’ला ‘डार्क हॉर्स’ समजत आहेत. दिग्गजांना पटकणी देऊन बदल घडवून आणण्याची खुमखुमी पंजाबच्या मतदारांना नेहमीच राहिली आहे. अशा वर्गाचा कल ‘आप’कडे दिसतो.
चन्नी हे दलित आहेत, पंजाबमध्ये दलितांची ३५ ते ४० टक्के मते आहेत. केवळ दलित नेता असा ठप्पा स्वत:वर मारून न घेता सर्वसमावेशक होण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. चन्नी यांना आधी मुख्यमंत्री अन् नंतर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असे दोन्ही निर्णय काँग्रेसने घेतले नसते तर अँटिइन्कमबन्सीचा मोठा फटका बसून आम आदमी पार्टीचा फायदा झाला असता. मात्र निवडणुकीआधीच हे दोन निर्णय घेऊन शर्यतीचा मोठा भाग काँग्रेसने जिंकला, असे मत लुधियाना सुधार प्रन्यासचे अध्यक्ष रमण बालसुब्रह्मण्यम यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
काँग्रेसचा निर्णयांचा धडाका
- काँग्रेसने निवडणुकीच्या चार महिने आधी चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून जनतेचा रोष कमी केला, त्यातच चन्नी यांनी १११ दिवसांत ५० मंत्रिमंडळ बैठका घेऊन निर्णयांचा धडाका लावल्याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.
- पंजाबवर गेली दोन दशके घराणेशाहींचीच सत्ता राहिली. बादल कुटुंब व पटियालाचे महाराजा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सत्ता भोगली. एकमेकांवर घोटाळे वा इतर कोणत्याही कारणांसाठी कारवाई होऊ द्यायची नाही याची पद्धतशीरपणे काळजी घ्यायचे अंडरस्टँडिंग दोघांमध्ये होते.
किसान आंदोलन अन् शरद जोशींची आठवण
महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या शेतकरी आंदोलनांना अभूतपूर्व पाठिंबा मिळत असे. मात्र, त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तेव्हा ते दोन मतदारसंघांमधून हरले. तशीच स्थिती पंजाबमध्ये दिसत आहे. किसान आंदोलनाला भरभरून प्रतिसाद मिळाला, पण त्यातून निर्माण झालेल्या संयुक्त समाज मोर्चाला चारदोन जागाही मिळणार नाहीत, असे राजकीय अभ्यासकांना वाटत आहे.
अकाली दलाची तुलना राष्ट्रवादीशी
आपल्याकडे निवडून येण्याची क्षमता असलेले किमान ३०-३५ चेहरे असणे हे जसे राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ आहे तशीच स्थिती अकाली दलाची पंजाबमध्ये आहे. अशा पाचपंचवीस उमेदवारांवर त्यांची मदार आहे. ते जिंकले तर भाजपप्रणीत आघाडीला सोबत घेऊन सत्तेत येण्याचा अकाली दलाचा गेम प्लॅन असेल.