चंडीगड : कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवल्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने रविवारी शस्त्र संस्कृती व हिंसाचाराचे उदात्तीकरण करणाऱ्या गीतांवर तसेच बंदुकीच्या सावर्जनिक प्रदर्शनांवर बंदी घातली. त्याचबरोबर राज्य सरकारने पुढील तीन महिन्यांत शस्त्र परवान्यांचे पुनरावलोकन करण्यासह कोणत्याही समुदायाविरुद्ध द्वेषयुक्त भाषण करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात या महिन्यात शिवसेना नेते सुधीर सुरी व डेरा सच्चा सौदाचे अनुयायी परदीप सिंग यांची एकापाठोपाठ हत्या झाली. या घटनांमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळल्याचा आरोप करत विरोध पक्ष आप सरकारला फटकारत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. राज्याच्या गृह विभागाने पोलिस प्रमुख, पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांची कल्पना देत त्यानुसार पावले उचलण्यास सांगितले.
शस्त्र संस्कृती व हिंसाचाराला उत्तेजन देणाऱ्या गाण्यांवर बंदी घालावी, शस्त्रास्त्रांचे सोशल मीडियावर प्रदर्शन तसेच सार्वजनिक मेळावे, धार्मिक स्थळे, लग्न समारंभ याबरोबर इतर कार्यक्रमात शस्त्रे बाळगण्यास व त्यांचे प्रदर्शन करण्यास बंदी घालावी, असे रविवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
पोलीस प्रशासनाला कठोर होण्याचे निर्देशतपासणी होणारयेत्या तीन महिन्यांच्या आत शस्त्र परवान्यांचा आढावा घेण्यात यावा आणि कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला शस्त्र परवाना दिला असल्याचे आढळल्यास तो तत्काळ रद्द करण्यात यावा. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तपासणी करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.