यदु जोशी
जालंधर : पंजाबच्या निवडणुकीत ९४ वर्षांचे दिग्गज अकाली दल नेते प्रकाश सिंग बादल यांच्यासह वयाची ऐंशी पार केलेले अनेक नेते रिंगणात उतरले आहेत. पंजाबच्याराजकारणाचा हा वृद्धाश्रम चर्चेचा विषय असून, घराणेशाहीची उदाहरणे जागोजागी दिसतात. नेत्यांचे ‘कुटुंब कल्याण’ जोरात आहे.आपल्याकडे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख दहावेळा आमदारकी जिंकले. बादलही तसेच दहावेळा जिंकलेले असून, आता हलका लंबी मतदारसंघातून अकराव्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी सज्ज आहेत. ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रात मंत्रीदेखील होते. त्यांचे ६० वर्षीय पुत्र आणि अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल हे जलालाबादमधून भाग्य अजमावताहेत. सुखबीर सिंग यांच्या पत्नी हरसिमरत कौर या भटिंडाच्या विद्यमान खासदार आहेत. स्वत:चा पक्ष स्थापन करून पटियाला शहरमधून लढत असलेले माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परनीत कौर या पटियालाच्या खासदार आहेत. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रेम सिंग चंदुमांजरा वयाच्या ७२व्या वर्षी घनौरमधून दंड थोपटून आहेत, तर त्यांचे पुत्र हरिंदरपाल सिंग हे सनौरमध्ये मैदानात आहेत. वादग्रस्त नेते विक्रम सिंग मजिठिया हे अमृतसर पूर्वमधून, तर त्यांची पत्नी गनीव कौर या मजिठियातून लढताहेत.
अजूनही यौवनात मी...९४ वर्षांचे प्रकाश सिंग बादल, ८० वर्षांचे कॅप्टन अमरिंदरसिंग पुन्हा निवडणूक आखाड्यात दंड थोपटून उभे आहेत. माजी मंत्री ८५ वर्षीय सुखदेवसिंग ढिंढसा यांनी स्वत:च्या पक्षाचे १५ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. रणजित सिंग ब्रह्मपुरा ८४, तोता सिंग ८१, जनमेजा सिंग सेखो ७७, काँग्रेसचे तृप्त रजिंदर बाजवा ७८, राजिंदर कौर भट्टल ७६, माजी मंत्री आणि आपचे उमेदवार जोगिंदर सिंग मान ७५, हे नेते अजून यौवनात मी म्हणत विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत.
- मुख्यमंत्री आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले चरणजित सिंग चन्नी हे भदोड आणि श्री चमकोर साहिब या दोन मतदारसंघांमधून लढताहेत; पण त्यांचे बंधू डॉ. मनोहर सिंग हे बस्सी पठाणातून अपक्ष लढत आहेत. काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडाचे निशाण फडकविले. - प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रताप सिंग बाजवा हे कादियामधून काँग्रेसचे, तर त्यांचे लहान बंधू फतेहजंग सिंग हे बटालामधून भाजपचे उमेदवार आहेत. - माजी रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांचे पुत्र मनीष (काँग्रेस) बरनालामधून, अकाली दलाचे राज्यसभा सदस्य बलविंदर सिंग भुंदड यांचे पुत्र आ. दिलराज सिंग सरदुलगडमधून, ‘आप’चे नेते माजी खासदार साधू सिंग यांची कन्या बलजित कौर मलोटमधून, फतेहगड साहिबचे काँग्रेस खासदार अमर सिंग पुत्र कामिल अमर सिंग (काँग्रेस) रायकोटमधून, अशी नातेवाइकांची मांदियाळी पंजाब निवडणुकीत दिसत आहे.