४ हजार प्रतिचौरस मीटरची जमीन २८,०९० दराने खरेदी; अयोध्येत घोटाळा, विरोधकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:32 AM2021-06-21T06:32:40+5:302021-06-21T06:33:02+5:30
काही दिवसांपूर्वी दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांना राम मंदिर ट्रस्टने खरेदी केली.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी जमीन खरेदीत झालेल्या कथित गैरप्रकारांवरून नवनव्या खुलाशांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन कोटी रुपयांची जमीन १८ कोटी रुपयांना राम मंदिर ट्रस्टने खरेदी केली. आता त्याच प्रकरणात एक आणखी खुलासा झाला. त्यातून चार हजार रुपये प्रतिचौरस मीटरची जमीन राम मंदिर निर्माण ट्रस्टने २८,०९० रुपये प्रतिचौरस मीटर भावाने खरेदी केली, असे दिसले.
याप्रकरणी काँग्रेस, माकप आणि समाजवादी पक्षाने केंद्र सरकार, योगी सरकार आणि भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. माकपचे नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या पूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावी, अशी मागणी केली.
काँग्रेसने विचारले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाला हे सांगावे की, फक्त ७९ दिवसांत जमिनीचा भाव १२५० टक्के कसा वाढला? प्रत्यक्षात सरकारने जमिनीचा दर चार हजार रुपये प्रतिचौरस मीटर ठरवलेला आहे. मग राम मंदिर निर्माण ट्रस्टने ती २८,०९० रुपये प्रतिचौरस मीटर भावाने का विकत घेतली?
काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, आता तर राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दासही म्हणत आहेत की, ट्रस्टच्या पैशांचा वापर कसा होत आहे, याबाबत चम्पत राय यांनी काहीही चर्चा केली नाही. नृत्य गोपाल दास यांचा आरोप याचा संकेत देतो की ट्रस्टमध्ये बसलेले लोक काेट्यवधी रुपयांचा घोटाळा करीत आहेत. स्वामी स्वरूपानंद यांनीही पैशांच्या दुरुपयोगाचा आरोप केला आहे.
आरोप काय?
काँग्रेसचा असाही आरोप आहे की, जमीन विकणारा दीप नारायण उत्तर प्रदेश भाजपचा नेता असून, अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांचा जवळचा नातेवाईक आहे. दीप नारायणने २,२४७ च्या भावाने जमीन खरेदी केली आणि फक्त ७९ दिवसांत २८,०९० रुपये दराने ट्रस्टला विकून टाकली. जमिनीच्या खरेदी-विक्रीचा दस्तावेज सार्वजनिक झाला असून, त्यातून हे सिद्ध होते की, जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे.