लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : १ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत २२,२१७ निवडणूक रोख्यांची खरेदी करण्यात आली. त्यातील २२,०३० निवडणूक रोखे वटविण्यात आले, अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्वोच्च न्यायालयाला बुधवारी दिली. न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘एसबीआय’ने म्हटले आहे की, निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील १२ मार्च रोजी आम्ही निवडणूक आयोगाला सादर केला.
‘एसबीआय’चे चेअरमन दिनेशकुमार खेरा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, प्रत्येक निवडणूक रोख्याचा खरेदी दिनांक, ते खरेदी करणाऱ्याचे नाव व त्या रोख्याचे मूल्य, असा तपशील निवडणूक आयोगाला दिला आहे. १ एप्रिल २०१९ ते ११ एप्रिल २०१९ या कालावधीत ३,३४६ रोख्यांची खरेदी झाली व त्यातील १६०९ रोखे वटविण्यात आले. १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १८,८७१ रोख्यांची खरेदी करण्यात आली तसेच २०,४२१ रोखे वटविले.
रोख्यांच्या खरेदीची तारीख, रोख्याचे मूल्य आणि खरेदीदाराचे नाव, ज्या राजकीय पक्षांसाठी हे रोखे वटविले ती तारीख, देणगी मिळालेल्या पक्षांची नावे आदी तपशिलाच्या सविस्तर नोंदी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहेत.तो सारा तपशील १२ मार्च रोजी कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी डिजिटल स्वरूपात (पासवर्ड संरक्षित) निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. एसबीआयने सादर केलेली निवडणूक रोख्यांबाबतची सर्व माहिती निवडणूक आयोगातर्फे त्याच्या वेबसाइटवर १५ मार्चपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.
रोख्यांची सर्व माहिती उघड करणार
‘एसबीआय’ने सादर केलेला निवडणूक रोख्यांबाबतचा सर्व तपशील आम्ही योग्य वेळी सर्वांसाठी खुला करणार, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची प्रक्रिया तसेच निवडणुकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सोपविल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींची माहिती जनतेला देण्यात येईल. निवडणूक रोख्यांबाबतची सर्व माहिती आम्ही जनतेला देणार आहोत, असे ते म्हणाले.