बंगळुरू : सत्ता परिवर्तनानंतर कर्नाटक विधानसभेच्या पहिल्या सत्राची सुरुवात नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या शपथविधीने झाली, तरी लक्ष वेधले ते काँग्रेस पक्षाने केलेल्या विधानसभेच्या शुद्धीकरणाने. पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा भवनात गंगेचे पाणी आणि गोमूत्र शिंपडले आणि हवन-पूजनानंतर हनुमान चालिसाचे पठण केले. भाजपने आपल्या भ्रष्टाचाराने विधानसभा दूषित केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी यावर्षी जानेवारीत विधानसभेत गोमूत्राने स्वच्छता करण्याची वेळ आल्याची टीका केली होती. राज्यात सत्तेत आल्यापासून काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजपला भ्रष्ट ठरवत काँग्रेसने सोमवारी विधानसभेचे गोमूत्राने शुद्धीकरण केले.
भ्रष्ट राजवट संपली...सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्ट भाजप राजवट संपल्यानंतर विधानसभा परिसर गोमूत्राने स्वच्छ आणि शुद्ध केला, असे सांगितले. दरम्यान, मांड्या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रवी गनिगा बैलगाडीने विधानसभेपर्यंत पोहोचल्याने चर्चेचा विषय ठरले.