लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तीन नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीसारखा अत्यंत पवित्र दिवस निवडला. प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाव्यतिरिक्त अन्य कोणताही हेतू त्या निर्णयामागे नव्हता, हे मोदींच्या या कृतीतून सिद्ध होते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
शहा यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे. मोदींनी म्हटल्याप्रमाणे, केंद्र सरकार यापुढे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत कार्यरत राहणार आहे. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी म्हटले आहे की, तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी गुरु नानक जयंतीच्या दिवशी केली आहे. त्यातून पंतप्रधानांची भूमिका लक्षात यावी. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नवे कृषी कायदे रद्द करण्याचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.