मुंबई - देशात नुकत्याच झालेल्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यात उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्ता कायम राखत भाजपाने नवा इतिहास रचला. मात्र उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पराभूत झाल्याने, आता भाजपा मुख्यमंत्री म्हणून कुणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता, मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे, आता लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही करण्याचं काम धामी यांनी हाती घेतलं आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी पुष्कर धामी यांच्या नावाची घोषणा होताच, त्यांनी सरकार पारदर्शकपणे चालविणार असल्याचं सांगितलं. तसेच, लवकरच भाजपने निवडणुकांपूर्वी दिलेली वचने पूर्ण करण्याचं काम हाती घेणार असून समान नागरी कायद्याला प्रधान्याने पू्र्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
धामी यांनी निवडणुकांपूर्वी आपल्य भाषणात समान नागरी कायद्याचा उल्लेख केला होता. हा कायदा बनविण्यासाठी आपण कमेटीची स्थापना करणार असून या समितीत कायदेशीर सल्लागार, वरिष्ठ नागरिक आणि बुद्धीजीवी नागरिक असतील, असेही त्यांनी सांगितले. भारतात राहणाऱ्या सर्वच नागरिकांना समान कायदा, असा या कायद्याचा अर्थ होतो. यास युनिफॉर्म सिव्हील कोड असेही म्हटले जाते. त्यानुसार, सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना एकच अधिकार असतात. लग्न, घटस्फोट, शेती-जमीन वाटपातही सर्वच धर्माच्या नागरिकांना समान कायदा लागू राहिल.
राजनाथसिंह यांनी केली नावाची घोषणा
पुष्कर धामी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पुष्कर सिंह धामी यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो, त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड वेगाने प्रगती करेल, असा मला विश्वास आहे. उत्तराखंडमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. तर १० मार्च रोजी निकाल जाहीर झाले. यामध्ये ७० पैकी ४७ जागा जिंकत दोन तृतियांश बहुमतासह भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. मात्र पुष्कर सिंह धामी पराभूत झाले होते.