देहरादून: भारतीय जनता पक्षाचे आमदार पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ४५ व्या वर्षांच्या धामी यांनी आज देहरादूनमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते उत्तराखंडचे सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यपाल बेबीरानी मौर्य यांनी धामी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. धामी उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
धामी यांच्यासोबत ११ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सत्पाल महाराज, डॉ. हरक सिंह रावत, यशपाल आर्य, डॉ. धन सिंह रावत, बिशन सिंह चुफल, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, यतेश्वरानंद आणि बंशीधर भगत यांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली. यापैकी सत्पाल महाराज, डॉ. हरक सिंह रावत यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे होती. मात्र भाजप नेतृत्त्वानं धामी यांच्या नावाला पसंती दिली.
राजनाथ सिंहांसोबतची जवळीक उपयोगीसंरक्षण मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्यासोबत धामी यांचे उत्तम संबंध आहेत. हेच संबंध धामी यांच्या कामी आले. ९० च्या दशकात धामी यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या कामानं सिंह खूप प्रभावित झाले. त्यानंतर धामी सातत्यानं राजनाथ यांच्या संपर्कात होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशीही धामी यांचे अतिशय उत्तम संबंध आहेत. कोश्यारी यांचं बोट पकडूनच धामी राजकारणात आल्याचं बोललं जातं.
साडे चार वर्षांत उत्तराखंडमध्ये तीन मुख्यमंत्रीगेल्या साडे चार वर्षांतले ते तिसरे मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंडमध्ये २०१७ मध्ये भाजपची सत्ता आली. त्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. याच वर्षी सुरुवातीला त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.