नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कतार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी दोहामध्ये तयारी सुरू आहे, परंतु याआधी काही भारतीय मजुरांनी आपला जीव गमावला आहे. मात्र बांधकाम संस्थांनी ना कुटुंबाला भरपाई दिली ना मृत्यूचे नेमके कारण सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे मजुरांची भरती करणाऱ्या कंपनीने त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांकडे पाच लाख रुपयांची मागणीही केली. पाच लाख रुपये न मिळाल्यास मृतदेह मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतातले अनेक मजूर हे कामासाठी कतारमध्ये गेले होते. त्यातच तेलंगणाचे 40 वर्षीय राजेंद्र प्रभूही होते.
राजेंद्र यांचा तिथे मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी कुटुंबीयांकडे करण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 2016 मध्ये ते कतारला गेले होते. एका एजन्सीतर्फे कामगारांना कतारला नेण्यात आलं. राजेंद्र यांना कामासाठी 2500 कतार रियाल (55 हजार रुपये) मिळणार होते, असं राजेंद्र यांनी कुटुंबीयांना सांगितलं होतं. त्यांच्यावर कर्ज असल्याने ते फेडण्यासाठी त्यांनी हे काम स्वीकारलं होतं; मात्र दोहा इथं पोहोचल्यावर परिस्थिती विचित्र असल्याचं राजेंद्रची पत्नी सुचैत्रा यांचं म्हणणं आहे.
राजेंद्र यांना घेण्यासाठी विमानतळावर कोणीही आलं नव्हतं किंवा पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. ज्या करारानुसार त्या कामगारांना तिथं नेलं होतं, तसं काहीही तिथे दिसत नव्हतं. तिथे गेल्यावर त्यांना नवीन करार देण्यात आला. त्यानुसार त्यांना कामाचे 22 हजार रुपयेच मिळणार होते. राजेंद्र यांच्यासारख्या कामगारांची भरती करणाऱ्या कंपनीने फसवणूक करून 55 हजार रुपयांच्या ऐवजी 22 हजार रुपयांचा नवा करार केला. राजेंद्र यांनी याबाबत जेव्हा विचारणा केली, तेव्हा हा कराराचाच भाग असल्याचं सांगण्यात आलं. त्या एजन्सीचं नाव कुटुंबीयांना शेवटपर्यंत कळलं नाही.
एजन्सीने फसवणूक करूनही राजेंद्र यांना पैसे कमावण्याबाबत विश्वास होता. कर्ज फेडण्यासाठी त्यांना काहीही करून पैसे कमावायचे होते. त्यांच्याकडे चांगली नोकरीही नव्हती आणि दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे ते खूप त्रासले होते, असं त्यांची पत्नी सुचैत्रा यांनी सांगितलं. ते त्यांच्या नशीबाला दोष देत होते. एकदा कर्ज फेडलं की घरी परत येणार होते. खूप कष्ट, अपुरा मोबदला आणि कर्ज यामुळे ते मानसिक तणाव होते, असं सुचैत्राचं म्हणणं आहे.
एके दिवशी राजेंद्र यांची पत्नी सुचैत्रा यांना राजेंद्र यांच्यासोबत काम करणाऱ्या कामगाराचा फोन आला. राजेंद्र यांनी आत्महत्या केल्याचं त्या कामगाराने सांगितलं. कामगार भरती करणाऱ्या एजन्सीने मृतदेह ताब्यात देण्यासाठी 5 लाख रुपये मागितले होते. भारतीय दूतावासाची मदत घेण्यात आली. मृत्यूनंतर 10 दिवसांनी राजेंद्र यांचा मृतदेह तेलंगणाला पोहोचला. सोबतच 30 हजार रुपयांचा कामाचा मोबदलाही मिळाला. राजेंद्र यांच्या माघारी त्याची पत्नी शिवणकाम करून 7 वर्षांच्या मुलीचा सांभाळ करून कर्ज फेडते आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"