बंगळुरू : भारतामध्ये वैविध्याचा आदर केला जातो. योगाच्या क्षेत्रात विविध पद्धतीने काम होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुणवत्ता नियंत्रण व एकसूत्रता आणणे हे आव्हानात्मक काम आहे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी येथे केले. योग मार्गदर्शक व्यावसायिकांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी योगतज्ज्ञ, आयुष मंत्रालय आणि क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या प्रतिनिधींच्या सुकाणू समितीची दुसरी बैठक शनिवारी आर्ट आॅफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये झाली. बैठकीस पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव, व्यास योग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र, नॅशनल अॅक्रिडिएशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडीज, क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे सीईओ अनिल जोहरी, आयुष मंत्रालयाचे डॉ. गझल जावेद, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या संगिता सक्सेना आदी मान्यवर उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
योगक्षेत्रात गुणवत्तेचे नियंत्रण आव्हानात्मक
By admin | Published: August 18, 2015 12:50 AM