मीना कमल, लखनौ उत्तर प्रदेशातील सर्वाधिक शक्तिशाली राजकीय कुटुंबात आमदार मुख्तार अन्सारी यांच्या कौमी एकता दलाच्या समाजवादी पार्टीत विलिनीकरणावरून ‘यादवी’ सुरू झाली असून हे विलिनीकरण थंडबस्त्यात पडण्याची चिन्हे आहेत.मुलायमसिंग यादव कुटुंबात कौमी एकताचे विलिनीकरण आणि अन्सारी यांच्यावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळेच माध्यमिक शिक्षणमंत्री बलराम यादव यांना मंगळवारी आपली खुर्ची गमवावी लागली. या सर्व घडामोडींनंतर येत्या २७ जून रोजी अखिलेश सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. माहितीनुसार बलराम यादव यांनीच कौमी एकता दलाच्या सपात विलिनीकरणाची पार्श्वभूमी तयार केली होती. खुद्द मुख्यमंत्री अखिलेश यादव अन्सारींच्या पक्षाशी युती अथवा विलयनाच्या विरुद्ध होते. अन्सारी यांच्या पक्षाचे काल सिंचन मंत्री शिवपालसिंग यादव यांच्या उपस्थितीत सपात विलिनीकरण झाले. अर्थात या विलिनीकरणानंतरही कौमी एकता दलाच्या दोन आमदारांपैकी एक मुख्तार अन्सारी यांना अद्याप समाजवादी पक्षामध्ये सामील करण्यात आले नसल्याचे शिवपालसिंग यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान बलराम यादव यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचा निपटारा आता पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव करतील. यासंदर्भात ते मुख्यमंत्री आणि शिवपालसिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत.
‘कौमी एकता’वरून यादवांकडे ‘यादवी’
By admin | Published: June 23, 2016 1:36 AM