मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत वृत्तावरून खासगी वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी जवळपास १२ तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवित तपास सुरू केला आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु असून अर्नब गोस्वामी यांच्या बाजुने निष्णात वकिल अॅड. हरिश साळवे लढत आहेत. हरिश साळवेंनी आपली बाजू मांडताना, अर्नब यांची चौकशी करणारा पोलीस कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे न्यायलयात सांगितले. यावरुन काँग्रेस नेत्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पालघर हत्याकांडासंदर्भातील चर्चेच्या कार्यक्रमात गोस्वामी यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका केल्याची तक्रार काँग्रेसच्यावतीने देशभरात ठिकठिकाणी नोंदविण्यात आली. याप्रकरणी नागपूर पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार हा गुन्हा पुढील तपासासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार गोस्वामी यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून पोलिसांकडून दोन नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्याच नोटीशीला प्रतिसाद देत गोस्वामी यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार सकाळपासून सुमारे १२ तास त्यांच्याकडे चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. आता, न्यायालयात अर्नब गोस्वामी यांची बाजू मांडताना, अॅड. हरिश साळवे यांनी, अर्नबची चौकशी करणाऱ्यांपैकी एक पोलीस कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर, कर्नाटकच्या बंगळुरूमधील युवक काँग्रेसचे नेते स्रीवत्सा यांनी अर्नब गोस्वामीला क्वारंटाईन करण्याची मागणी केली आहे.
अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात माहिती दिली, त्यानुसार अर्णबची चौकशी करणारा एक पोलीस कोरोना पॉझिटीव्ह आहे. मग, अर्णब यांना आत्तापर्यंत क्वारंटाईन का करण्यात आलं नाही. अर्णब हे आत्ताही स्टुडिओत जाऊन आपला शो कसा काय घेऊ शकतात. अर्णब यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सर्वांनाच क्वारंटाईन करण्यात यावे, अशी मागणीही स्रीवत्सा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे केली. स्रीवत्सा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना या ट्विटमध्ये मेन्शन केले आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी प्रतिककुमार शामसुंदर मिश्रा आणि अरुण बोराडे यांना अटक करण्यात आली होती.