नवी दिल्ली : कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असतानाही त्यांना जबरदस्ती सात दिवस पंचतारांकित हॉटेलात क्वारंटाईन होण्यास भाग पाडल्याने ब्रिटनहून दिल्लीस परतलेल्या एका कुटुंबातील चार सदस्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पंचतारांकित हॉटेलात राहण्याचा खर्च परत मिळावा, अशी मागणीही या कुटुंबाने केली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने विमान वाहतूक संचालनालय व परराष्ट्र मंत्रालय यांना नोटिसा काढल्या असून, त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे तसेच अहवाल निगेटिव्ह असताना कोणालाही अशाप्रकारे क्वारंटाईन होण्यास भाग पाडणे बेकायदा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
हे कुटुंब २० फेब्रुवारील ब्रिटनहून दिल्लीला आल्यावर त्यांची दिल्ली विमानतळावर कोविड चाचणी झाली. चौघांना अहवाल निगेटिव्ह आला तरीही त्यांना एका पंचतारांकित हॉटेलात जबरदस्तीने पाठविण्यात आले. ते चौघे अद्याप हॉटेलात असून, त्यांनी वकिलांमार्फत न्यायालयात धाव घेतली आहे. आपणास घरी परतण्याची मुभा मिळावी आणि हॉटेलचा खर्च केंद्र व दिल्ली सरकार यांनी द्यावा, अशी विनंतीही त्यांनी वकिलांद्वारे केली आहे.
काय आहे नियम?
ब्रिटनहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करू नये, ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल, त्यांनाच संस्थात्मक विलगीकरणात म्हणजे हॉटेलात क्वारंटाईन करावे, असे दिल्ली विमानतळाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या कुटुंबाला हॉटेलात क्वारंटाईन करण्याची गरजच नव्हती.
डॉक्टरांनी दिला दुसऱ्या लाटेचा इशारा
बंगळुरूत सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत असून, डॉक्टरांनी साथीच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. डॉक्टरांनी म्हटले आहे की, तीन दिवसांपासून अधिकचा ताप, अंगदुखी असेल तर कोरोना चाचणी करून घ्यावी. अशी लक्षणे असल्यानंतर स्वत:च औषधी घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉ. रामन राव म्हणाले की, ताप, सर्दीच्या रुग्णांमध्ये दहा टक्के वाढ झाली आहे. हे कोरोनाचे रुग्ण नसले तरी काळजी घेण्याची गरज आहे.