लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून तसेच अदानी प्रकरणात संसदीय समिती स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत वातावरण तापले आहे. दुसऱ्या दिवशीही कामकाज स्थगित करण्याची वेळ आली. परंतु तत्पूर्वी राज्यसभेत भारताला दोन ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना हलकेफुलके वातावरणही तयार झाले. त्यातच ‘ऑस्कर’ पुरस्कारांचे श्रेय मोदी सरकार घेणार नाही हीच अपेक्षा, असा टोला काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांनी लगावला.
आम्ही दिग्दर्शन केले आहे, आम्ही लिहिले आहे, मोदीजींनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले, असे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये, असे म्हणताना खरगे हसू लागले. त्यांचे म्हणणे ऐकून सत्ताधारी पक्षात बसलेले पीयूष गोयल आणि एस. जयशंकरही जोरजोरात हसू लागले.
राहुल गांधी माफी मागा...
लोकसभेत राहुल गांधी यांचे वक्तव्य आणि अदानी प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यानंतर कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब झाले. दुपारी दोन वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आपापल्या जागी उभे राहून ‘राहुल गांधी माफी मागा’ अशा घोषणा देत होते, तर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जेपीसी स्थापन करण्याची मागणी लावून धरली.
गोयल यांना नोटीस
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत सत्ताधारी भाजपच्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसने सभागृह नेते पीयूष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. एकवेळ तहकूब केल्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नोटाबंदी : मृत्यूंबाबत अधिकृत अहवाल नाही : सरकार
केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, नोटाबंदीमुळे झालेल्या मृतांच्या संख्येबाबत कोणताही अधिकृत अहवाल त्यांना प्राप्त झालेला नाही. तृणमूल काँग्रेसचे सदस्य अबीर रंजन बिस्वास यांनी सरकारकडे नोटाबंदीमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येची माहिती मागवली होती, त्यावर सरकारने ही माहिती दिली. मात्र, १८ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सभागृहात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मान्य केले होते की, नोटाबंदीच्या काळात चार लोकांचा मृत्यू झाला होता. यात संबंधित कुटुंबांना ४४ लाखांची भरपाई देण्यात आली होती.
सरकारचे परराष्ट्र धोरण हे अदानी समूहाला फायदा करून देण्याचे आहे. हे उद्दिष्ट अदानीजींना अधिक श्रीमंत करणे हे आहे का? गेल्या नऊ वर्षांपासून मोदीजींनी देशाला गोंधळात टाकले आहे आणि अदानीजींना जगाच्या दौऱ्यावर आपल्यासोबत ठेवले आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"