नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आज पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. या सोहळ्यात एका विशेष व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. पाकिस्तानी सैन्यात कर्नल पदावर राहिलेल्या काझी सज्जाद अली झहीर (quazi sajjad ali zahir gets padma shri award) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं. कर्नल झहीर यांनी पाकिस्तानी लष्करातील अनेक गुप्त कागदपत्रं, दस्तावेज भारताला सोपवले होते. बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या हजारो तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं होतं. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तान सरकारनं त्यांना मृत्यूदंड देण्यासाठी ऑर्डर काढली होती.
काझी सज्जाद अली झहीर भारतात आल्यानंतर बांगलादेशातील त्यांचं घर पाकिस्तानी सैनिकांनी पेटवून दिलं. त्यांच्या आईला आणि बहिणीला पाकिस्तानी सैन्यानं टार्गेट केलं. मात्र त्या सुरक्षितस्थळी पळून गेल्या. कर्नल झहीर १९६९ च्या अखेरीस पाकिस्तानी लष्करात सहभागी झाले. त्यावेळी बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता. पाकिस्तानी सैन्याच्या तोफखान्यात कार्यरत असलेल्या झहीर यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानच्या विविध भागांत पाठवण्यात आलं होतं.
कर्नल झहीर पाकिस्तानी लष्कराच्या १२ पॅरा ब्रिगेड स्पेशल फोर्समध्ये कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्य पूर्व पाकिस्तानातील (आताचा बांगलादेश) लोकांवर करडी नजर ठेवून होतं. पूर्व पाकिस्तानातील जनता अत्याचार आणि नरसंहाराला कंटाळून बंड करतील अशी भीती पाकिस्तानी सैन्याला होती. पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर जाताच पाकिस्तानी सैन्यानं स्थानिक जवान आणि अधिकाऱ्यांनी ग्राऊंड ड्युटीवरून हटवलं. बंड टाळण्यासाठी दोन बांगलादेशी सैनिकांना सोबत ड्युटी देणं बंद करण्यात आलं.
पाकिस्तानी सैन्य बांगलादेशात करत असलेले अत्याचार पाहून कर्नल झहीर यांना धक्काच बसला. त्यांनी पाकिस्तानमधून पळ काढला आणि भारतात आले. पाकिस्तानी सैन्याबद्दलची अतिशय गोपनीय माहिती त्यांनी भारताला दिली. अंगावर असलेले कपडे आणि खिशात असलेले २० रुपये घेऊन झहीर जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये आले. पाकिस्तान सोडताना त्यांनी स्वत:सोबत अतिशय महत्त्वाचे दस्तावेज आणले. ते दस्तावेज त्यांनी भारत सरकारला सोपवले.